“
शरीर हे एकच साम्राज्य असं आहे, आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक ह्या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघी जाणतात, एकमेकींचं एकमेंकींवर अतिक्रमणही होतं. त्या वेळी संपूर्ण साम्राज्य जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघीही भरून काढतात. अधिकार आणि अंमल ह्यात ज्या राजधानीची सरशी होईल त्या प्रमाणात साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्याचे पाच सल्लागार. दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकूमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षड्रिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्धी, अपेयपान, भ्रष्टाचार ह्या सगळ्यांचं थैमान आहे. दोन्ही राजधान्यांतले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळं पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा दोन्ही राजधानींत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही.
”
”
V.P. Kale (वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995 (Marathi Edition))